बदनापूर (जिल्हा. जालना) : देवपिंपळगाव शिवारात शेतातील घरातून निघून गेलेल्या माय-लेकराचा मृतदेह बुधवारी (ता.२२) सकाळी स्वतःच्या शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत २५ वर्षीय विवाहित महिला तिच्या पाच वर्षाच्या मुलासह मंगळवारी (ता.२१) सकाळी ७ वाजेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी (ता.२२) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून बदनापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
देवपिंपळगाव शिवारातील शेतातील घरात राहणाऱ्या गोदावरी बाळासाहेब नन्नवरे (वय २५) व त्यांचा मुलगा सार्थक बाळासाहेब नन्नवरे (वय ५) दोघे मंगळवारी सकाळी सात वाजता आपल्या राहत्या घरातून निघून गेले होते. या संदर्भात त्यांचे पती बाळासाहेब गोरखनाथ नन्नवरे (वय ३०) यांनी दिलेल्या माहितीवरून मंगळवारी (ता.२१) सायंकाळी बदनापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र बुधवारी (ता. २२) सकाळी आई गोदावरी व मुलगा सार्थक यांचा मृतदेह स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना दिसून आला.
याबाबत बाळू बबनराव नन्नवरे (रा. देवपिंपळगाव) यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, फौजदार पूजा पाटील, सहाय्यक फौजदार इब्राहिम शेख, निवृत्ती शेळके, श्री. खंडागळे, नितीन ढिलपे, श्री. जारवाल, अनिल चव्हाण या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. तसेच घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, दोघा माय-लेकरांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेलगाव (ता. बदनापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार आत्महत्या की घातपात या बाबत बदनापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
(संपादन : प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.